आठवणी | 🥀

                        
              
मनाचे पाखरू उडून आज एका वेगळ्याच प्रश्नाच्या   फुलावर येऊन थांबलय 
अर्थातच मनातल्या मनातच बंड सुरू आहे
आणि विचार करु वाटतोय खूप सार्‍या गोष्टींचा
असे म्हणतात मनुष्य हा एक समाजप्रिय प्राणी आहे आणि असे का म्हणतात याचा थोडासा साक्षात्कार
झाल्यासारखे वाटतय
कोणी मला या टप्प्यावर येऊन विचारले की तू काय कमावले या मोजक्या आयुष्यात ?
तर माझे मनापासून एकच उत्तर निघेल
आणि ते म्हणजे 
                           "नाती "
आपल्या कळत नकळत आपण किती व्यक्ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडत असतो
प्रत्येक नात्याची एक वेगळीच व्याख्या असते 
कधीकधी बसची वाट बघता बघता झालेली दोन मिनिटाची ओळख 
तर कधी लाईट बिल भरत असताना रांगेत उभे राहून पेन मागण्याचा निमित्ताने जोडले गेलेलं नातं 
रक्ताच्या  नात्या  पलीकडे पण आपण कितीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात जोडत असतो 
कदाचित काही लोकांबरोबर विचार जुळले म्हणून
तर  कधी विचार कसे काय जुळत नाहीत म्हणून !
कधी या धावपळीच्या आयुष्यात क्षणभर विश्रांती काढून विचार केलाय का 
आजपर्यंत किती माणसे आपण  कमवली आणि किती गमवली ?
असे म्हणतात आयुष्यात येणारे तसेच आयुष्यातून निघून जाणारे लोक आपल्याला खूप काही शिकवून जातात
शिकवणुकीचे तर माहीत पण आठवणीची पिशवी देऊन जातात    
ज्यात काही गोड कडू तर वेळप्रसंगी आंबट गोड आठवणी असतात.
आजूबाजूला बघितले तर जाणवते किती पळत होतो आपण एका काल्पनिक अश्या ध्येयामागे 
कित्येकदा पळता पळता आपण स्वतःला देखील  विसरून  जातो . आयुष्यात टप्प्याटप्प्यावर कितीतरी लोक भेटत असतात पण अखेर ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत शुल्लकच सोबत असतात. काही लोक क्षणासाठी भेटतात पण आयुष्यभरासाठी पुरतील अश्या आठवणींचे ठसे मागे सोडून जातात . 
काही लोक अशी असतात की आपण त्यांच्याशिवाय आपले आयुष्य शुल्लक समजतो काही नाती असतात त्यांना वेळोवेळी गप्पांची देन लागत नाही समजुतदारीच्या अखंडतेने  ती आयुष्यभरासाठी जोडली जातात  कधी कधी तर आपल्याला देखील ठाऊक नसते. आपण इतके लोक जोडले कसे? 
पण मागे वळून पाहिल्यावर त्यांचा आपल्यावर असलेला विश्वास आणि सदिच्छा नवीन उर्मी देऊन जातात जगण्यासाठी.
बघितलं तर व्यवहार ज्ञानाने सज्ज असलेल्या जगात भावनांची देवाणघेवाण करत किती सुंदर पणे  नात्यांची आकडेमोड पार पाडत असतो आपण
      हा , मान्य आहे गैरसमजाची किड लागून जाते नात्याला आणि अर्थातच त्याला अहंकाराची जोड लागते आणि मग सहजपणे खूप नाती वजा होऊन जातात आयुष्यातून... मग नेहमी मीच का ? या विचाराने आयुष्यात कितीतरी पाने अर्धवटच सोडून देतो आपण 
मनातल्या मनात तेथे बुकमार्क ठेवून पण वळुन मागे बघण्याची हिंमत मात्र होत नाही..हा मान्य आहे कधी आपली चूक असते तर कधी समोरच्याची पण एका गोष्टीमुळे आपण आपली आठवणींची शिदोरी तेथेच सोडतो.
म्हणूनच मित्रांनो  नाते कसे पण असो जवळचे अथवा लांबचे   "व्यक्त्त होणे " हे नक्कीच गरजेचे असते जिथे आपण व्यक्तत होणे सोडून देतो तिथे मग ते ना ते पण गुदमरुन एके दिवशी आपला जीव सोडून देते मग आपल्याकडे उरतात त्या फक्त आठवणीच !
शेवटी आपल्याच हातात आहे कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे . जगण्यासाठी पैसे नक्कीच गरजेचे आहेत पण ते " जगणे नाही " . हा फरक समजला पाहिजे . पैसे आज आहेत तर उद्या कदाचित नाही मात्र या असण्या नसण्याच्या खेळात जी माणसे हात घट्ट पकडून आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतील अशी माणसे कमवणे जास्त गरजेचे.
आणि मग मधूनच डोक्यात येणार्‍या या अशा आठवणींच्या प्रवासाला पूर्णविराम मिळतो तो या एकाच गाण्याने..

              नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं
               बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं
                ये यादें किसी दिल-ओ-जानम के
                   चले जाने के बाद आती हैं
                         यादें यादें यादें.....
 
                         - शुभदा राजेंद्र शिर्के.🌻

 

Comments

Post a Comment

Popular Posts